सावित्रीबाई फुले
सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जानेवारी ३, इ.स. १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचं व बोलताही यायचं. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. यावरून त्यांच्या मनात असलेले अक्षरांचे आकर्षणही दिसून येते.
एकूणच ज्ञानासाठी आतूर असलेले दोन तेजस्वी जीवनप्रवाह एक झाले होते. ‘त्यांनी करेल ते र्मों आणि आपण शिकलो की पाप’ हा ज्योतिरावांनी वडिलांना विचारलेला प्रश्र्न सावित्रीला पतीच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला. ‘सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं’. या शब्दात त्यांनी पतीला ताकद दिली. ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वत: शिकून सावित्रीबाईंना शिकवलं. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतलं आणि भारताच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण घटना घडली.
१ मे, १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे भिडेंच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आलं की गोर्या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील. नरकाच्या भीतीने का हाईना लोक शिक्षणाला होकार देऊ लागले.
दिनांक १ जानेवारी, १८४८ रोजी भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. ही अखंड हिंदुस्थानातली स्वदेशीय व्यक्तीने काढलेली पहिलीच मुलींची शाळा. सावित्रीबाई ‘हेडमिस्ट्रेस’ म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला.... अशा बोंबा मारून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण नकळत्या वयात नाग ठेचणार्या सावित्रीला माणसांची भीती वाटणं शक्य नव्हतं. अनेक संकटं पार करत हा ज्ञानप्रसाराचा प्रवास चालूच राहिला.
केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.
सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही (१८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment